उत्तर, मध्य आणि ईशान्य भारतातील राज्‍यांना धुक्याने व्यापले

Fog Alert : ४०० उड्डाणे आणि 200 रेल्‍वे गाड्या उशिरा धावल्‍या, पुढील दोन दिवस धुके राहणार
Weather Update
उत्तर, मध्य आणि ईशान्य राज्‍यांना आज (दि. ५) सकाळी दाट धुक्याने व्‍यापले. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर, मध्य आणि ईशान्य राज्‍यांना आज (दि. ५) सकाळी दाट धुक्याने व्‍यापले. सलग दुसऱ्या दिवशी बहुतांश भागात दृश्यमानता शून्यावर पोहोचली. थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे आणि हवाई सेवा विस्कळीत झाली . दिल्लीत उतरणारी १९ विमाने वळवावी लागली, तर ४०० हून अधिक उड्डाणे उशिराने सुरू झाली. उत्तर भारतातही जवळपास २०० गाड्या उशिराने धावल्या. पुढील दोन दिवस दाट धुके, डोंगरावर बर्फवृष्टी आणि काही मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते, असासही अंदाज वर्तविण्‍यात आला आहे.

१४ राज्‍यांमध्‍ये दाट धुक्‍याचा वाहतूक व्‍यवस्‍थेत परिणाम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्याचा परिणाम 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिसून आला. दिल्लीचे पालम, सफदरजंग, जम्मू-काश्मीरचे श्रीनगर, हरियाणाचे हिसार, पंजाबचे पटियाला, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, उत्तर प्रदेशचे बरेली, झाशी, बहराइच, वाराणसी, आग्रा, गाझियाबाद, लखनौ, कानपूर, मध्य प्रदेशचे ग्वाल्हेर, राजस्थानच्या श्रीगंगानगर, बिहारच्या पूर्णिया, भागलपूर आणि आसामच्या गुवाहाटीमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्य राहिली. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी 50 ते 200 मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आली. कमी दृश्यमानतेमुळे वाहने रस्त्यावर रेंगाळत राहिली आणि रुळांवर गाड्यांचा वेग थांबला.

दुपारनंतर विमान वाहतूक सुरळीत

दाट धुक्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सने सकाळच्या वेळेत त्यांच्या विमानांच्या आगमन आणि निर्गमनावर तात्पुरती बंदी घातली आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने प्रवाशांना फ्लाइटच्या वेळेची माहिती मिळाल्यानंतरच घर सोडण्याचा सल्ला दिला आहे. शनिवारी दिल्लीसह चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, गुवाहाटी आणि पाटणा येथे सर्वाधिक उड्डाणे प्रभावित झाली. दिल्लीत धुक्यामुळे 13 देशांतर्गत, दोन आंतरराष्ट्रीय आणि दोन नॉन-शेड्युल्ड फ्लाइट इतर शहरांमध्ये वळवाव्या लागल्या. दुपारपर्यंत वातावरण निवळल्यानंतर उड्डाणे सामान्य झाली.

रेल्‍वे गाड्या आठ तासांहून अधिक उशिराने धावल्या

उत्तर रेल्वेच्या गाड्यांच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला. 59 हून अधिक गाड्या सहा तास उशिराने तर 22 गाड्या आठ तासांपेक्षा जास्त उशीराने धावल्या. अनेक गाड्या एक ते चार तास उशिराने धावत आहेत. या गाड्यांमध्ये वंदे भारत, जम्मू राजधानी, आंध्र एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस यांचाही समावेश होता. नवी दिल्ली, आनंद विहार, निजामुद्दीन, गाझियाबाद, कानपूर, वाराणसीसह सर्व स्थानकांवर कडाक्याच्या थंडीत प्रवाशांना गाडीची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news