

नवी दिल्ली ः उत्तर भारतापासून ते पश्चिम भारतापर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाब आणि गुजरातमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे, तर दुसरीकडे जम्मू-श्रीनगर महामार्ग सुमारे 16 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला केला.
गुजरातच्या बनासकांठासह 3 जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत 16 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे वाव-थराद आणि सुईगाम तालुक्यांमध्ये पूर आला आहे. या तिन्ही तालुक्यांतील डझनभर गावांमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचले असून बचावकार्य सुरू आहे.
पंजाबमधील सर्व 23 जिल्हे अजूनही पुराच्या गंभीर समस्येशी झुंज देत आहेत. राज्यातील 2000 हून अधिक गावांमध्ये पुराचे पाणी साचलेले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पंजाबसाठी 1600 कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. जम्मू खोर्याची जीवनरेखा मानला जाणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बुधवारी 16 दिवसांनंतर वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. रस्त्यावर अनेक ठिकाणी सतत भूस्खलन होत असल्यामुळे हा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान उधमपूर आणि रामबन जिल्ह्यांमध्ये झाले होते. महामार्ग पुन्हा सुरू झाल्याने काश्मीर खोर्यातून फळे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.
हरियाणात यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. 9 सप्टेंबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा 46 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सामान्यतः 385.1 मिमी पाऊस पडतो; मात्र यंदा आतापर्यंत 563.8 मिमी पाऊस झाला आहे. यमुनानगरमध्ये सर्वाधिक 1080.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.