

नवी दिल्ली : देशात सहा बाळांना बहुचर्चित ह्युमन मेटान्युमिनो विषाणूचा (एचएमपीव्ही) संसर्ग झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. त्यात कर्नाटकातील दोन, गुजरातमधील एक, तामिळनाडूतील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच हा विषाणू काही नवीन नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहे.
श्वसनाच्या विकाराशी संबंधित रुग्णांवर नियमित देखरेख ठेवण्यात येते. त्यात हे रुग्ण आढळले आहेत. ब्रोन्कोन्युमोनिया झालेल्या एका तीन महिन्यांच्या अर्भकाला बंगळूरमध्ये ‘एचएमपीव्ही’ची लागण झाली; मात्र बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर अन्य एका आठ महिन्यांच्या बाळालाही या विषाणूचा संसर्ग झाला. त्याचीही प्रकृती वेगाने सुधारत आहे, असे स्पष्ट करण्यात आले. यातील एकाही रुग्णाचा परदेश प्रवास अथवा परदेश प्रवास करून आलेल्यांशी संपर्काचा इतिहास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वसनाच्या सामान्य विकाराप्रमाणे याची लक्षणे आहेत.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) आणि एकात्मिक आजार सर्वेक्षण कार्यक्रमाकडील देशव्यापी माहितीच्या संकलनानुसार, तापासारख्या रुग्णांच्या संख्येत असामान्य वाढ झाल्याचे आढळत नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आयसीएमआर ‘एचएमपीव्ही’च्या अस्तित्वावर वर्षभर लक्ष ठेवून असते, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुलांमध्ये ‘एचएमपीव्ही’चा संसर्ग झाला असल्यास त्याला वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. कोणताही साधा खोकला आणि सर्दीकडे दुर्लक्ष करू नका. त्यात जर संसर्ग वाढला तर श्वसनाला त्रास होऊ शकतो, असे कोलकात्यातील ‘सीएमआरआय’ रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रुची गोलाश यांनी सांगितले.