

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि. १ फेब्रुवारी) लोकसभेत सलग आठवा विक्रमी अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. यावेळी त्यांनी कृषी, उद्योग, विकास आणि शिक्षणासह विविध क्षेत्रांसह आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी काम करण्यास वचनबद्ध आहे. आरोग्य सुरक्षेसाठी देशभरात २०० कॅन्सर डे केअर सेंटर उघडण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, २०१४ पासून वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी १.१ लाख वैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर जागा वाढवण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये १०,००० अतिरिक्त जागा वाढवल्या जातील. सरकार पुढील ३ वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्रे स्थापन करण्यास मदत करेल. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी ३६ जीवनरक्षक औषधांना सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली जाणार आहे. (Union Budget 2025)
जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द
देशभरातील जिल्ह्यांमध्ये २०० कॅन्सर डे केअर सेंटर उघडणार
वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन
पंतप्रधान जन आरोग्य योजनेची घोषणा
हा अर्थसंकल्प विकासाची गती वाढवण्यासाठी, सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, देशांतर्गत संवेदनशीलता मजबूत करण्यासाठी आणि मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मखानाचे उत्पादन आणि त्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी, मखान बोर्डाची निर्मिती, वैद्यकीय पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांच्या जागा वाढविण्यासह अनेक घोषणा केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.