

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी वधू पाहण्यासाठी गेलेल्या एका प्रौढ व्यक्तीचे चक्क मुलाच्या होणाऱ्या सासूबाईंशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रकरण उघडकीस येताच मुलाच्या कुटुंबात मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला, ज्यामुळे अखेरीस या प्रकरणाने पोलीस ठाण्याची पायरी गाठली. पोलीस ठाण्यामध्ये अनेक तास चाललेल्या सामंजस्य बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी सलोख्याने प्रकरण मिटवण्यात आले. असे असले तरी, या अनोख्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
फतेहपूर जिल्ह्यातील एक व्यक्ती सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपल्या मुलाचे लग्न ठरवण्यासाठी कौशांबी जिल्ह्यातील महेवाघाट परिसरात गेला होता. दरम्यान होणा-या सुनेचा बघण्याचा कार्यक्रम पार पडता-पडता या मुलाच्या रंगेल बापाने मुलीच्या आईशी सूत जुळवले. दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण यासंबंधीची कुणकुण जेव्हा त्या व्यक्तीच्या पत्नीला लागली, तेव्हा घरात मोठा वाद झाला. पत्नीने थेट कौशांबी पोलिसांसह फतेहपूर पोलिसांकडेही या प्रकरणाची तक्रार दाखल केली.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या महिला पोलीस ठाण्यात या अनोख्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणावर पंचायत आयोजित करण्यात आली होती. या पंचायतीत असे ठरले की, तो प्रौढ व्यक्ती आता आपल्या मुलाचे लग्न त्या घरात करणार नाही. तसेच, त्याने मुलीच्या आईशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत.
या तडजोडीनंतर दोन्ही बाजूंनी पुढील कोणतीही कायदेशीर कारवाई करणे टाळले आणि आपापल्या घराची वाट धरली. कौशांबी आणि फतेहपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे अजब-गजब प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
याप्रकरणी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी नीलम राघव यांनी सांगितले की, ‘मुलाच्या वडिलांचे आणि मुलीच्या आईचे अनपेक्षित संबंध असल्याचे प्रेम प्रकरण आमच्यासमोर आले. या प्रकरणी पंचायत बसवल्यानंतर दोन्ही बाजूंनी तडजोड करण्यात आली. आम्हाला कोणतीही कारवाई नको आहे, असे त्यांनी लिखित स्वरूपात दिले आहे.’
दुसऱ्या एका घटनेत, उरई येथील जालौन महामार्गावर प्रेमी-प्रेयसीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या ड्रामामागील कारण म्हणजे, प्रियकर सरकारी अभियंता (JE - जुनिअर इंजिनीअर) बनल्यानंतर प्रेयसीशी लग्न करण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
रविवारी सायंकाळी हे प्रेमी युगल एका रेस्टॉरंटमधून जेवण करून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी दोघांमध्ये लग्नावरून चर्चा सुरू झाली आणि चालत्या दुचाकीवरच त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढताच प्रियकराने गाडी थांबवली आणि मुलीला रस्त्याच्या मध्येच सोडून जाण्याचा प्रयत्न केला. यावर मुलीने त्याचा रस्ता अडवला आणि भररस्त्यात बसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तसेच आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर दोघांमध्ये पुन्हा जोरदार बाचाबाची झाली. जवळपास दोन तास रस्त्यावर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.