

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Accidents) गुरुवारी (दि.५) रात्री उशिरा झालेल्या दोन भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. पीलीभीत येथे भरधाव कारचे नियंत्रण सुटून झाडावर धडकून अपघात झाला. या अपघातात झाड तुटून कारवर पडल्याने कारमधील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. चित्रकूटमध्ये ट्रक आणि बोलेरो यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांना जीव गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधून पिलीभीतला विवाह सोहळ्यासाठी कारमधून लोक आले होते. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर वधू पक्षाचे लोक कारमधून घरी परतत होते. नुरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेन गुल मॅरेज हॉलजवळ भरधाव कार खड्ड्यात पलटी होऊन ती झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, झाड तुटून कारवर पडले. (Uttar Pradesh Accidents)
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेसीबी मशिनच्या साहाय्याने झाड हटवले आणि गाडीतील लोकांना बाहेर काढले या अपघातात चालकासह कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश पांडे हेही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. पोलीस अधीक्षकांनी जखमींवर उपचाराची व्यवस्था केली असून घटनेला दुजोरा देत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
त्याचवेळी चित्रकूट-झाशी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे पाच वाजता झालेल्या अपघाताने मन हेलावून गेले. रापुरा येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजकडून एकाच कुटुंबातील लोकांना घेऊन येणारी बोलेरो समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.