नवी दिल्ली : देशभरात टोल कर वसुलीसाठी सध्या आस्तित्वात असलेली फास्टॅग प्रणाली लागू राहील. टोल करासाठी सॅटेलाईट प्रणाली १ मे पासून सुरु होणार असल्याचे दावे खोटे असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी दिले. १ मे पासून फास्टॅग बंद केले जाईल आणि सॅटेलाइट टोल प्रणाली लागू केली जाईल, असे दावे केले जात होते. केंद्रीय मंत्रालयाने स्पष्टीकरणाच्या निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
सॅटेलाइट टोल प्रणालीऐवजी, सरकार एका नवीन प्रणालीची चाचणी घेत आहे. टोल नाक्यावरून टोलकर देऊन बाहेर पडण्यासाठी वाहनांना कमीत कमी वेळ लागावा, यासाठी काही निवडक टोल नाक्यांवर एएनपीआर - फास्टॅग आधारित प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीत ‘स्वयंचलित नंबर प्लेट ओळख’ तंत्रज्ञान अंतर्भूत असून त्याद्वारे वाहनांच्या नंबर प्लेटची नोंद घेऊन वाहनांची ओळख पटवली जाईल. फास्टॅगच्या रेडिओ लहरी ओळख प्रणालीद्वारे टोल कर कापून घेतला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
प्रस्तावित प्रणालीनुसार, टोल नाक्यावर वाहन न थांबवता देखील उच्च क्षमतेच्या एएनपीआर कॅमेऱ्यातून वाहनांची ओळख पटवून त्वरित फास्टॅगमधून टोल कर कापला जाईल. टोल कर कापला न गेल्यास अथवा चुकवला असल्यास वाहनधारकांना ई-नोटीस पाठवली जाईल. तरीही कर न दिल्यास फास्टॅग रद्द करणे किंवा इतर दंड आकारले जातील. ही अडथळामुक्त ‘एएनपीआर- फास्टॅग पथकर प्रणाली’ राबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढल्या असून काही निवडक टोल नाक्यांवर ती सुरु केली जाईल. तिची कार्यक्षमता आणि वापरकर्ता प्रतिसाद यांचे मूल्यमापन करून नंतर ती प्रणाली देशभरात राबवण्याविषयी निर्णय घेतला जाईल,असे मंत्रालयाने म्हटले आहे.