पुढारी ऑनलाईन डेस्क : २६ नोव्हेंबर २०२४ पासून सलग १३१ दिवस बेमुदत उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांनी रविवारी उपोषण मागे घेतले. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासह आंदोलक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी हे उपोषण पुकारले होते. फतेहगड साहिब डिस्ट्रीक येथील श्रीहिंद येथे जमलेल्या किसान महापंचायत वेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘मला काल बेमुदत उपोषण सोडण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मी तुमच्या भावनांचा आदर ठेवतो व मी हे उपोषण स्थगित करत आहे.’ कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान व रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी शनिवारी दल्लेवाल यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती.
याबाबत चौहान यांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहले आहे की सरकारचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार सुरु आहे. शेतकरी जगजित सिंग दल्लेवाल हे नुकतेच हॉस्पिटलमधून परतले आहेत. मी आशा करतो की त्यांच्या प्रकृतीत लवकरचे सुधारणा होईल. आम्ही त्यांना उपोषण सोडण्याबाबत विनंती केली होती व शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल असे सांगितले होते’.