

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जून महिन्यात 260 जणांचा बळी घेणार्या एअर इंडियाच्या बोईंग 787 विमान दुर्घटनेत कोणताही यांत्रिक दोष नव्हता, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने काढला आहे. विमानाची इंधन नियंत्रण प्रणाली (फ्युएल कंट्रोल युनिट) पूर्णपणे सामान्य स्थितीत कार्यरत होती, असे ‘एफएए’ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे अपघाताचा तपास आता मानवी भूमिकेच्या दिशेने वळला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान (फ्लाईट 171) 12 जून रोजी उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 प्रवासी आणि जमिनीवरील 19 नागरिक, अशा एकूण 260 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातून 27 वर्षीय विश्वासकुमार रमेश हा एकमेव प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला.
‘एफएए’च्या तपासणीनुसार, विमानाच्या फ्युएल कंट्रोल युनिट आणि स्विच यंत्रणेत कोणताही बिघाड किंवा अनपेक्षित हालचाल झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे यांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची शक्यता पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे.
भारताची विमान अपघात अन्वेषण ब्यूरो (एएआयबी) या प्रकरणाचा मुख्य तपास करत आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमानाचे दोन्ही फ्युएल कंट्रोल स्विच ‘रन’ स्थितीवरून ‘कटऑफ’ स्थितीत आले, ज्यामुळे दोन्ही इंजिन बंद पडले. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटने इंधन का बंद झाले, असा प्रश्न विचारला, तर दुसर्याने आपण तसे केले नसल्याचे सांगितले. या संभाषणावरून ही कृती हेतूपुरस्सर होती की अनवधानाने घडली, याबाबत गूढ निर्माण झाले आहे.
एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील सर्व बोईंग विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण केली असून, त्यात कोणताही दोष आढळलेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. बोईंग कंपनीनेही 787 विमानांच्या इंधन प्रणालीत कोणतीही तांत्रिक समस्या नसल्याचे म्हटले आहे.
यांत्रिक बिघाडाची शक्यता फेटाळल्यामुळे आता तपास मानवी भूमिकेवर केंद्रित झाला आहे. ही अत्यंत असामान्य घटना असून, सामान्य उड्डाण प्रक्रियेनुसार नाही, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे. ‘एएआयबी’कडून अंतिम अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे आवाहन तपास यंत्रणांनी केले आहे.