पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन याचिका अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि. २३)फेटाळला. यापूर्वी सत्र कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. तिने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ऑगस्टमध्ये अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. तथापि, पुरावे आणि आरोपांचे पुनरावलोकनानंतर उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
हे प्रकरण केवळ एका संस्थेविरुद्धच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध फसवणूक दर्शवते. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे, असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. आता पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आलेला आदेश निकालात निघाला आहे.
पूजा खेडकर हिला केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)मधून ७ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यमुक्त केले होते. आयएएस (प्रोबेशनरी) नियम 1954 च्या नियम 12 अन्वये त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. र चुकीच्या पद्धतीने OBC आणि दिव्यांग सवलत घेतल्याचा आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली होती. खेडकर यांनी फक्त आयोगाचीच फसवणूक केलेली नाही तर जनतेचीही फसवणूक केलेली आहे, असे UPSCने म्हटले होते. पूजा खेडकर (३४) हिची पुण्यात प्रोबेशनवर नियुक्ती झाली होती. त्यांनी स्वतंत्र केबिन आणि कार मागितल्यानंतर त्या चर्चेत आल्या. तसेच तिने आपल्या खासगी ऑडी कारवर लाल दिवाही लावला होता. यातून त्याच्यावर टीकेची झोड उठली. सुरुवातीची कारवाई म्हणून पूजा खेडकरीची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. यानंतर लाल बहाद्दुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने जुलै २०२४ मध्ये तिचे प्रशिक्षण स्थगित केले होते.