

नवी दिल्ली : 'ईव्हीएम'विरोधाचा इंडिया आघाडीकडून सुरू असलेला एकजूटीचा लढा आता मोडकळीस येऊ लागला आहे. नॅशनल कॉन्फरन्सनंतर तृणमूल काँगेसनेही 'ईव्हीएम'बाबत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'ईव्हीएम'मधील छेडछाडीचे काही पुरावे असतील तर ते समोर आणा, असे तृणमूलने म्हटले आहे. खोटे आरोप करून काहीही साध्य होत नाही, असा सल्ला तृणमूलने काँग्रेसला दिला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी संसदेच्या संकुलात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोप करणाऱ्यांनी 'ईव्हीएम' कसे हॅक केले जाऊ शकते, हे स्पष्ट केले पाहिजे. जे 'ईव्हीएम'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन त्याचा डेमो दाखवावा. मॉक पोल आणि मतमोजणीच्या वेळी बूथवर काम करणारे लोक ईव्हीएम तपासत असतील, तर या आरोपात काही योग्यता आहे असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर 'ईव्हीएम'वर शंका उपस्थित केल्या होत्या. महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करत पक्षाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली होती.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'ईव्हीएम'बाबत इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी सांगितलेल्या गोष्टींचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आता त्यांचे सहकारीही तेच सांगत आहेत. निदान आता तरी काँग्रेसने समजून घ्यायला हवे. ममता बॅनर्जी तसेच राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गट आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही तेच सांगत आहेत. लोकशाहीत मजबूत विरोधीपक्षाचे महत्त्वही केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला स्वत:ची जाणीव झाली पाहिजे, त्यांची चूक काय आहे हे त्यांनी समजून घेतले पाहिजे आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. मजबूत विरोधकही हवा आहे. आम्हाला काँग्रेस किंवा विरोधी पक्ष पूर्णपणे कमकुवत झालेला पाहायचा नाही. आम्हाला ते नको आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षा इतकेच विरोधी पक्षाला महत्त्व असते, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.