नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शेतीचे प्रश्न आणि मोदी सरकारविरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष सोडवण्यासाठी कृषी मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्यांच्या भेटीची मोहीम सुरू ठेवत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी (दि.1) उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या खर्चात कपात करणे, योग्य भाव मिळणे, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले.
इथुन पुढे कृषिमंत्री प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांसोबत चौपाल सुद्धा घेणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांशिवाय कृषी शास्त्रज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. शेतकरी चौपालद्वारे शेतीच्या समस्यांवर तातडीने उपाय शोधता येतील, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास पिकांच्या सिंचनावर परिणाम होऊ नये म्हणून तो वेळेत बदलण्यात यावा, अशा अनेक व्यावहारिक समस्या शेतकऱ्यांनी आज कृषीमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. कारखान्यांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी आणि त्यामुळे पिकांचे किंवा भूगर्भातील पाण्याचे नुकसान होत असल्याची चर्चाही शेतकऱ्यांनी केली. ही चर्चा माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न छोटे वाटतात पण ते सोडवल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न १० ते २० टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे निकृष्ट कीटकनाशके आणि बियाणे यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित समस्या शेतकऱ्यांना होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार कायदे अधिक कठोर करण्याचा विचार करणार असल्याचे ठरवले आहे. कृषीमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भारतीय किसान युनियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. तरुण शर्मा यांनी 'पुढारी' शी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत. यावर उपाय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.