

तिरुपती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढ आणि भारताचे जागतिक नेतृत्व यावर एक अत्यंत महत्त्वाचे आणि चर्चेत राहील असे विधान केले आहे. ‘भारताला जर जागतिक महासत्ता बनायचे असेल, तर देशातील लोकसंख्या, ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड आपल्या पारंपरिक मूल्यांशी घालणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. विशेष म्हणजे, देशातील लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले असावीत, असा सल्ला दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 'इंडियन सायन्स काँग्रेस'मध्ये बोलताना नायडू यांनी भारताच्या भविष्याचा आराखडा मांडला. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विचारांशी सहमती दर्शवत नायडू म्हणाले की, ‘जर आपल्या तरुणांचे टॅलेंट आणि आपली लोकसंख्या योग्य दिशेने आणि राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित झाली, तर भारताला जगातील सर्वोच्च शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ यावेळी त्यांनी १९६१ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचेही कौतुक केले. हे विद्यापीठ भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा अभिमान जपण्याचे प्रमुख केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताची बौद्धिक ताकद नवीन नाही, हे सांगताना नायडू यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले. ४,५०० वर्षांपूर्वीचे प्रगत नगररचना शास्त्र, तक्षशिला आणि नालंदा यांसारख्या विद्यापीठांनी जगाला गणित, खगोलशास्त्र आणि अर्थशास्त्राचे ज्ञान, हजारो वर्षांपूर्वी भारताने आध्यात्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांती यांचाही त्यांनी यावेळी दाखला दिला.
चंद्राबाबू नायडू यांनी भारतीय आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या उच्च उत्पन्नाचा उल्लेख करत हे भारताचे मोठे 'स्ट्रॅटेजिक ॲडव्हांटेज' असल्याचे सांगितले. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने घेतलेली झेप पाहता, भारत लवकरच जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत आपण पहिल्या क्रमांकावर असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसंख्येसोबतच संसाधनांच्या नियोजनावरही त्यांनी भर दिला. 'राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचे' समर्थन करताना त्यांनी 'गंगा-कावेरी प्रकल्प' हे देशाचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राथमिकतांमध्ये जलसुरक्षेचा समावेश आहे. सर्व राज्यांनी परस्पर सामंजस्याने हा प्रकल्प राबवल्यास शेती आणि उद्योगाला नवीन संजीवनी मिळेल. देशात पाण्याचे समान वाटप झाल्यास विकास प्रक्रियेला वेग येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे लोकसंख्या नियंत्रणावर चर्चा होत असताना, चंद्राबाबू नायडू यांनी 'लोकसंख्या वाढीच्या' समर्थनात दिलेला हा तर्क भविष्यातील 'लोकसंख्याशास्त्रीय लाभांश' लक्षात घेऊन केल्याचे जाणकारांचे मत आहे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण पिढीची संख्या महत्त्वाची असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.