

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेलाच्या खरेदीमुळे भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्यासाठी युरोपीय संघावर दबाव आणला आहे; मात्र हा दबाव झुगारून युरोपीयन देशांनी भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटींना वेग दिला आहे. या वाटाघाटींना अंतिम रूप देण्यासाठी युरोपीय संघाचे व्यापार आयुक्त नवी दिल्लीत दाखल होत आहेत.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, करारातील 60-65 टक्के भाग अंतिम झाला असून लवकरच हा करार पूर्णत्वास जाईल. युरोपीयन युनियनमधील देशाच्या प्रतिनिधींसोबत भारतासोबत चर्चा सुरू आहे. हा करार 2025 च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकतो, ज्यामुळे 2026 च्या सुरुवातीला होणार्या पुढील EU-भारत शिखर परिषदेसाठी एक संयुक्त धोरणात्मक अजेंडा तयार होईल.
अमेरिकेप्रमाणेच या करारातही कृषी क्षेत्र हा सर्वात गुंतागुंतीचा विषय आहे. स्थानिक शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत हे क्षेत्र पूर्णपणे खुले करण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर EU च्या कृषी आयुक्तांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. वाईन आणि स्पिरिटस्, प्रक्रिया केलेले कृषी उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ, शाश्वततेची वचनबद्धता आणि व्यवसाय व्हिसा हे काही इतर प्रमुख वादग्रस्त मुद्दे आहेत.
सात वर्षांच्या खंडानंतर 2022 मध्ये या करारावरील चर्चा पुन्हा सुरू झाली. सध्या दोन्ही बाजूंमधील व्यापार सुमारे 120 अब्ज युरो आहे. डिजिटल व्यापार आणि फसवणूकविरोधी उपाययोजनांवरील वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, आता कृषी क्षेत्रावर औपचारिक चर्चा सुरू झाली आहे.
युरोपीयन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना वर्षाअखेरीस हा करार पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे डॅनिश राजदूत रासमस नॉरगार्ड यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ ठरवणार्या ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना भारतीय अर्थव्यवस्थेला ‘जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ म्हटले आहे.
ही प्रगती अशावेळी होत आहे, जेव्हा ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढवला आहे. युक्रेन युद्धाला रशियन तेलाच्या खरेदीतून मदत मिळत असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधून होणार्या आयातीवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्यासाठी एण नेत्यांवर दबाव आणला आहे. मात्र, एण अधिकार्यांनी कायदेशीर अडथळे, सुरू असलेल्या वाटाघाटी आणि संघाची स्वतःची व्यापारी उद्दिष्टे यांचे कारण देत ही कल्पना नाकारली आहे.