

Provident Fund interest
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.२५ टक्के मंजूर केला. यामुळे ईपीएफओकडून ७ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांच्या निधीमध्ये वार्षिक व्याजदर जमा केले जाईल. ईपीएफओने २८ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर मागील आर्थिक वर्षातील व्याजदराइतकाच आहे.
२०२४-२५ साठी मंजूर केलेला व्याजदर अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता ८.२५ टक्के व्याजदराला अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे आणि कामगार मंत्रालयाने ईपीएफओला याबाबत पत्र पाठवले आहे, असे कामगार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २३७ व्या बैठकीत व्याजदराचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये पीएफवरील व्याजदर ८.१५ टक्के होता. या अगोदर २०२१-२२ आर्थिक वर्षांसाठी पीएफवरील व्याजदर ८.१ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये ८.५ टक्के होता.