

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये गुरुवारी सुरू झालेली चकमक शुक्रवारीही सुरूच होती. या चकमकीमध्ये लपून बसलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. शुक्रवारी (दि.11) सकाळी पुन्हा सोपोर परिसरात गोळीबार सुरू झाला होता. यावेळी सोपोरच्या सगीपोरा गावात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्थान दिले आहे. अशी माहिती वृत्तसंस्था 'एएनआयने' त्यांच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट करत दिली आहे.
सुरक्षा दलांनी सोपोरच्या सागीपोरा भागात ऑपरेशन सुरू केले आहे. ही कारवाई सोपोर पोलिस आणि 22 राष्ट्रीय रायफल्स (RR) यांच्या संयुक्त पथकाने केली. नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, संयुक्त सैन्याने त्यांना चकमकीच्या ठिकाणाहून हटवले होते, सुरक्षा दलांना सोपोरच्या सगीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कराने परिसरात शोध मोहीम राबवली. गुरुवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू होता.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधील ग्राम संरक्षण समितीचे दोन सदस्य गुरुवारी सकाळपासून बेपत्ता झाले होते. सकाळपासून ते बेपत्ता असल्याची पुष्टी लष्कराच्या सूत्रांनी केली असून, त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने दावा केला आहे की त्यांनी दोन्ही व्यक्तींचे अपहरण करून त्यांची हत्या केली आहे. नजीर आणि कुलदीप अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत अधिकृत शोध सुरू असून अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.