

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा- विजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत सुरू असलेल्या चकमकीबद्दल माहिती देताना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले, ''सुकमामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला यश मिळाले आहे. तिथे ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तिथे शोध मोहीम सुरू आहे."
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना सकाळी ही चकमक सुरू झाली.
तर छत्तीसगडमधील दुसऱ्या एका संयुक्त कारवाईत राज्य पोलिस आणि सीआरपीएफ २२९ बटालियनने अवापल्ली पोलिस स्थानक क्षेत्रातील मुरदांडा गावात आयईडी शोधून तो निकामी केला. नक्षलवाद्यांनी रिकाम्या बिअरच्या बाटल्यांत २ आयईडी पेरून ठेवले होते. ते शोधून काढून निकामी करण्यात आले आहेत.