पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज (दि.७) जाहीर झाला. ( Delhi Assembly Elections schedule) दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे, अशी घाेषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस असा तिरंगी सामना या निवडणुकीत रंगणार आहे.
पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "पोलिंग एजंटसमोर ईव्हीएम सील केले जातात. एजंटसमोर ईव्हीएममध्ये निवडणूक चिन्हे टाकली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया मतदानाच्या आधी सात ते आठ दिवस केली जाते. प्रत्येक पक्षाला याची माहिती दिली जाते. ईव्हीएमची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे. ईव्हीएममध्ये अवैध मतदान होण्याची शक्यता नाही."
निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "ईव्हीएममध्ये विश्वासार्हतेचा किंवा कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस असणार्याचा प्रश्नच नाही. ईव्हीएममध्ये बेकायदेशीर मतांचा प्रश्नच नाही. कोणतीही हेराफेरी शक्य नाही. "उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सतत तेच सांगत आहेत."
७० सदस्यीय विधानसभा निवणडणुकीसाठी एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी सलग चाैथ्यांदा सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप आणि काँग्रेसचे मोठे आव्हान सत्ताधारी आप समोर असणार आहे. आपसाठी अस्तित्वाची तर भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना शिष्टाचाराची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
दिल्लीत १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रे असतील. ८५ वर्षांवरील व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतील. निवडणुका हा आपल्या सर्वांचा समान हक्क आहे, असेह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
सोमवारी (दि. 7 जानेवारी) निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. दिल्लीत एकूण 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८३,४९,६४५ आहे, तर महिला मतदारांची संख्या ७१,७३,९५२ आहे. तर तृतीय लिंगाची संख्या १,२६१ आहे.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यासह आपच्या नेत्यांवर कारवाई झाली. तेव्हापासून केंद्र सरकार विरुद्ध आम आदमी पार्टी असा संघर्ष सुरु आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला. तेव्हापासून या संघर्षाला आणखी धार आली आहे. आता 'आप'ला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपचे नेते मागील काही महिन्यांपासून तयारी करत आहेत. तर केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनीही पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठीची रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. दिल्ली विधानसभेसाठी आप आणि काँग्रेस आमने-सामने असणार आहेत.
सलग १५ वर्ष दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. यानंतर ७० सदस्यीय विधानसभा निवणडणुकीत २०१५ आणि २०२० मध्ये आम आदमी पार्टीने अनुक्रमे ६७ आणि ६२ जागांसह विजय मिळवत विरोधी पक्षांच्या अस्तित्वालाच धक्का दिला होता. २०२४ लोकसभा निवडणूक 'इंडिया' आघाडीतून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्रितपणे लढवल्या होत्या. मात्र आता एक वर्षानंतर दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजपनेही मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरु ठेवली आहे. एकीकडे आप सरकारने आपल्या कार्यकाळात दिल्लीतील शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. तर भाजपने आपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत प्रचार सुरु केला आहे. तर आप आणि भाजप पेक्षाही एक सक्षम पर्याय म्हणून काँग्रेस आपली धोरणे मतदारांसमोर मांडत आहे.
आप, भाजप आणि काँग्रेस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली आहे. नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल यांचा सामना भाजपचे माजी खासदार परवेश साहिब सिंग आणि काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित, दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांच्याशी होणार आहे. मुख्यमंत्री आतिशी यांची लढत काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीतील भाजपच्या माजी खासदार यांच्याशी होणार आहे.