

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी काल दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची सूचना केली होती. यावर आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी बोलतो आणि ठरवतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. सत्तेत राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची भावना आहे.
आज एकनाथ शिंदे काही प्रमुख नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनेक महत्वाची खाती मिळावीत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होते तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. एकनाथ शिंदे यांची १२ मंत्रिपदांची शहा यांच्याकडे मागणी केल्याचे वृत्त पुढारी न्यूजने दिले आहे. तर भाजपने गृहखाते सोडण्यास नकार दिला आहे. अजित पवार यांनी देखील अमित शाह यांची भेट घेत आपली भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे. यामध्ये गृह, नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क तसेच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्रीपदं देताना योग्य सन्मान राखावा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र या सर्व चर्चेत गृहखाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. गृह, महसूल, उर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन ही खाती भाजप स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रही आहे.
तर अजित पवार हे अर्थ, महिला बाल विकास, अल्पसंख्यांक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा या संभाव्य खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.