Padma Awards 2026 | महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा ‌‘पद्म‌’ सन्मान

धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’; खा. हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार
Padma Awards 2026 |
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी रघुवीर खेडकर, उदय कोटक आणि दिवंगत धर्मेंद्र यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी पुरस्कार स्वीकारले.
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. सोमवारी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘मरणोत्तर पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला.

सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. नोव्हेंबर 2025 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक आणि पीयूष पांडे (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उदय कोटक यांनी एका छोट्या बिल डिस्काऊंटिंग स्टार्टअपपासून देशातील अग्रगण्य खासगी बँक उभी करून भारतीय बँकिंग क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सोबतच, जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पीयूष पांडे यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

5 मान्यवरांना ‘पद्मश्री’

याप्रसंगी राज्यातील 5 मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रघुवीर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोककलेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे पुत्र असलेले रघुवीर खेडकर यांनी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ जागतिकस्तरावर पोहोचवली असून, लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही त्यांनी केले आहे. जनार्दन बापुराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लाल कंधारी गायींच्या संवर्धनासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. नागपूरस्थित उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी सोलर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्र आणि खाणकाम उद्योगात दिलेल्या योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. जुझर वासी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोडबोले दाम्पत्याला संयुक्त ‘पद्मश्री’

मूळचे पुण्याचे असलेले डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला संयुक्तपणे ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली 35 वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील बस्तर आणि अबुझमाडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे कार्य केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news