पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.१२) छापे टाकले. प्रशिक्षणार्थी निवासी महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणानंतर घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणीत 'ईडी'ने त्यांना अटक केली हाेती.
संदीप घोष याच्या दोन फ्लॅट, वैद्यकीय पुरवठादाराचे कार्यालय आणि कोलकाता येथील एका सेल्समनच्या निवासस्थानावर ईडीने छापे मारले. या प्रकरणी अलीकडेच ईडीने राज्यातील हावडा, सोनारपूर आणि हुगळीत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी 'ईडी'ने आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एफआयआरच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात डॉ. संदीप घोष याच्या नावाचा समावेश आहे. सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेजमधील आर्थिक हेराफेरीच्या संदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमासोबत गुन्हेगारी कट, फसवणूकाचा गुन्हाही त्याच्यावर दाखल केला आहे.
डॉ. संदीप घोष यांनी फेब्रुवारी 2021 ते सप्टेंबर 2023 पर्यंत आरजी कार हॉस्पिटलचे प्राचार्य म्हणून काम केले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये बदली झाली; परंतु एका महिन्याच्या आत पुन्हा त्याची या रुग्णालयात नियुक्ती झाली होती.