Subhash Chandra | कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योजक सुभाष चंद्रांविरोधात ईडीचा मनी लाँडरिंगचा गुन्हा!

एलआयसी हाऊसिंग फायनान्सची १,३२२ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
Subhash Chandra
सुभाष चंद्रा.File Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची (एलआयसीएचएफएल) १,३२२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे. सुभाष चंद्रा यांनी दोन कंपन्यांसाठी एकूण ९८० कोटी रुपयांचे कर्ज मिळवताना स्वतःच्या मालमत्तेचे मूल्य वाढवून दाखवले आणि त्यासाठी कथित बनावट संपत्ती प्रमाणपत्रे सादर केली, असा आरोप आहे.

वसंत सागर प्रॉपर्टीज आणि डिजिटल सबस्क्रायबर मॅनेजमेंट या कंपन्यांना अनुक्रमे ५०० कोटी आणि ४८० कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी ही प्रमाणपत्रे वापरण्यात आल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. डी.जे.एम. अँड कंपनी आणि एम.पी.जे. अँड कंपनीच्या माध्यमातून सुभाष चंद्रा यांची संपत्ती ४० हजार कोटींवरून ५९ हजार कोटी रुपये दाखवण्यात आल्याचा आरोप एलआयसीएचएफएलने केला आहे.

मात्र, दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान २०२४ मध्ये सुभाष चंद्रा यांनी आपली संपत्ती केवळ ३१.७९ कोटी रुपये असल्याचे नमूद केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कर्जफेड न झाल्यामुळे एलआयसीएचएफएलला १,३२२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही म्हटले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.