

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) यांनी बुधवारी २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्र उभारणीचे पहिले पाऊल म्हणजे मतदान आहे, असे यावेळी ते म्हणाले. तसेच डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. (Election Commission of India)
पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार म्हणाले की, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि नेहमी मतदान केले पाहिजे. भारताची राज्यघटना, निवडणूक कायदे, नियम आणि त्यामध्ये जारी केलेल्या सूचनांनुसार भारत निवडणूक आयोग मतदारांच्या पाठीशी होता, आहे आणि नेहमीच राहील, असे ते म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आणि डॉ. विवेक जोशी यांच्या निवडणूक आयुक्त म्हणून निवडीला मंजुरी दिली होती. त्या अगोदर सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली होती. या निवडीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बैठकीत विरोध केला होता.
ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे माजी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड होण्याअगोदर ते निवडणूक आयुक्त होते. त्याअगोदर ते गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयात सचिव होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये ते सचिव पदावरुन निवृत्त झाले. तर डॉ. विवेक जोशी हे १९८९ च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.