

President Droupadi Murmu Rafale flight Ambala :
देशाच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५) भारतीय हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेल फायटर जेटमधून उड्डाण घेत इतिहास रचला यापूर्वी एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील फायटर जेटमधून उड्डाण केलं होतं.
राष्ट्रपती मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेलमधून उड्डाण केलं. त्यांच्यासोबत एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग हेदेखील विमानात उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी राफेलमधून केलेली ही भरारी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. यापूर्वी ८ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई-३० मधून उड्डाण घेतले होते. मात्र, राफेल फायटर जेटमधून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
लष्करी जवानांना प्रोत्साहन राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असल्याने, त्यांनी अशाप्रकारे देशाच्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानामध्ये उड्डाण केल्याने भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांमध्ये उत्साहाचे आणि प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगाचे लक्ष या उड्डाणाकडे लागले असून, यातून जगाला भारताच्या सामरिक ताकदीची झलक पाहायला मिळाली आहे.
यापूर्वी दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही लढाऊ विमानातून प्रवास केला होता. त्याच परंपरेत आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधून उड्डाण घेऊन, देशाची सुरक्षा आणि सामर्थ्य याप्रती आपला विश्वास दर्शवला आहे.