Kashmir Drought | काश्मीरमध्ये दुष्काळाची भीती; झेलमसह उपनद्यांची पाणीपातळी खालावली

५ डिसेंबरला बर्फवृष्टीची शक्यता
Kashmir Drought |
Kashmir Drought | काश्मीरमध्ये दुष्काळाची भीती; झेलमसह उपनद्यांची पाणीपातळी खालावली
Published on: 
Updated on: 

अनिल साक्षी

जम्मू : काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टीने दीर्घकाळ दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोऱ्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या झेलम नदीसह तिच्या उपनद्यांची पाणीपातळी सातत्याने खालावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ५ डिसेंबरपर्यंत व्यापक पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता कमी असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

सिंचन आणि पूरनियंत्रण विभागाने २२ नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, संगम येथे झेलम नदीची पाणीपातळी उणे ०.६३ फूट इतकी नोंदवण्यात आली. श्रीनगरमधील राम मुन्शीबाग येथे ही पातळी ३.८० फूट, तर अशाम येथे १.३० फूट होती. वुलर सरोवराची पाणीपातळीही १५७३.८३ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. या आकडेवारीवरून जलस्रोतांवरील वाढता ताण स्पष्ट होत आहे. हवामान विश्लेषक फैजान आरिफ यांनी दीर्घकाळ कोरडे हवामान कायम राहिल्यास छोटे नाले, झरे आणि नैसर्गिक जलप्रवाह आटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

७६ झरे पूर्णतः आटले...

यापूर्वीच्या सर्वेक्षणातूनही या संकटाची तीव्रता समोर आली आहे. २०२१-२२ मध्ये अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यांतील ६४९ नैसर्गिक झऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी ७६ झरे पूर्णपणे आटल्याचे, तर ८.५ टक्के झरे हंगामी स्वरूपाचे असल्याचे आढळले होते.

वीजनिर्मितीवर परिणाम होणार

पाणीपातळीतील घसरणीचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरच नव्हे, तर जलविद्युत निर्मितीवरही होण्याची शक्यता आहे. सध्या मोठे संकट निर्माण झालेले नसले, तरी कोरडे हवामान अधिक काळ कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे संकट तीव्र होण्यापूर्वी प्रशासन जलसंधारण, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था कितपत प्रभावीपणे करते, याकडे आता काश्मीरवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.