

नवी दिल्ली/अहिल्यानगर : भारतीय संरक्षण क्षेत्राने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आज एक मोठे यश संपादन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीआर) महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील के. के. रेंजमध्ये तिसर्या पिढीतील स्वदेशी बनावटीच्या ‘मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल’ची (एमपीएटीजीएम) यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने धावत्या लक्ष्यावर टॉप अटॅक करून आपली अचूकता सिद्ध केली.
अशी आहेत या क्षेपणास्त्राची तांत्रिक वैशिष्ट्ये
एकदा डागल्यानंतर हे क्षेपणास्त्र लक्ष्याचा आपोआप मागोवा घेते. यात आधुनिक इमेजिंग इन्फ्रारेड (आयआयआर) सीकर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. शत्रूच्या रणगाड्याचा वरचा भाग सर्वात कमकुवत असतो. हे क्षेपणास्त्र हवेत झेपावून रणगाड्यावर वरून हल्ला करते, ज्यामुळे आधुनिक रणगाडेही उद्ध्वस्त होऊ शकतात. आयआयआर सीकरमुळे हे क्षेपणास्त्र दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी प्रभावीपणे कार्य करू शकते. या क्षेपणास्त्राच्या विविध भागांच्या विकासात हैदराबाद, चंदीगड, पुणे, जोधपूर आणि डेहराडून येथील डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांचे मोलाचे योगदान आहे.
संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता हे शस्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहे. हे क्षेपणास्त्र ट्रायपॉडवरून किंवा लष्करी वाहनावरून डागले जाऊ शकते. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे या शस्त्रास्त्र प्रणालीचे उत्पादन भागीदार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले असून, हे पाऊल स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही या यशस्वी चाचणीचे कौतुक केले आहे.
रणगाडाविरोधी शक्तीत भर
भारताने विकसित केलेले हे तंत्रज्ञान जगातील मोजक्याच देशांकडे उपलब्ध आहे. सीमावर्ती भागात विशेषतः लडाख किंवा वाळवंटी प्रदेशात हे क्षेपणास्त्र पायदळासाठी गेम चेंजर ठरणार आहे.