

नवी दिल्ली : राज्याच्या आदिवासी भागातील निवडक विद्यार्थ्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीने विद्यार्थ्यांना मोठी ऊर्जा मिळाल्याचे दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने सातत्याने कृतिशील उपक्रम राबविले जातात. आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजावे. या स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, त्यातून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने दैनिक ‘पुढारी’ने ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षा अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षेला 24 हजार विद्यार्थी बसले होते. यापैकी गुणवत्ता प्राप्त 24 विद्यार्थ्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घडवून आणली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वत: आदिवासी समाजातील आहेत. एक आदिवासी महिला ते देशाच्या सर्वोच्च व्यक्ती, राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्याशी भेटून नवचैतन्य आले. राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काय व्हायचे आहे, असे विचारत त्यांच्या स्वप्नांचा वेध घेतला. जगाला गवसणी घालण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश देत या विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा दिली, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी तालुक्याच्या तहसीलदारांनाही कधी पाहिले नाही, कधी त्यांच्या दालनात जाण्याचा योग आला नाही, तिथे थेट देशाच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याची संधी दैनिक ‘पुढारी’मुळे मिळाली, याबाबत दैनिक ‘पुढारी’ला धन्यवाद द्यावेत तितकेच थोडे असल्याच्या भावनाही यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.