

नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी "कवी कट्ट्याचे" उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा मागील काही वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात कवी कट्ट्याचा मागील काही वर्षांचा प्रवास, मराठी भाषा, साहित्य, आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. कवी कट्ट्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी मंडपाचा आकार वाढवत न्यावा लागतो, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. महिला आणि साहित्य यांचा परस्पर संबंध, साहित्यिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला.
महिलांचे साहित्य संमेलन आणि बालकवी संमेलन आयोजित करणे, सर्व कवींना एकत्र आणणारे अखिल भारतीय कवी संमेलन भरवणे, विद्यापीठांच्या धर्तीवर साहित्य विश्वात माजी कवी-सदस्य संकल्पना राबवणे, असे काही महत्वाचे प्रस्ताव डॉ. गोऱ्हे यांनी मांडले. काही कविताही त्यांनी सादर केल्या. तसेच ग्रंथनगरीला भेट देऊन प्रकाशक, लेखक आणि वाचकांशीही त्यांनी संवाद साधला.