डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर राजघाटाजवळ उद्या होणार अंत्यसंस्कार
पुढारी ऑनलाईन डेस्क: Manmohan Singh passes away | भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी (२८ डिसेंबर) सकाळी ८ वाजता काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. सकाळी ८.३० वाजतापासून काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ९.३० वाजता. काँग्रेस मुख्यालयातून डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा सुरु होईल. राजघाटाजवळील सरकारी स्मशानभूमीत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारकडून ७ दिवसांचा दुखवटा जाहीर
शुक्रवारी (दि.२७) सकाळीपासून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह देशभरातील नेते आणि मान्यवरांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर नागरिकांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या अगोदर केंद्रीय मंत्रीमंडळाने आणि काँग्रेस कार्य समितीने डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर केला. यानुसार केंद्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच देशभरासह जगभरातून मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला असून त्यांना आदरांजली वाहिली आहे
मनमोहन सिंग यांच्या तीनही मुली आज येणार भारतात
मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. आज (दि.२७) संध्याकाळपर्यंत त्यांच्या तीन मुली अमेरिकेतून भारतात येणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तीन मुली आहेत. माजी पंतप्रधानांच्या तीनही मुलींचे आपापल्या क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग 65 वर्षांची आहे. त्यांना दोन मुले आहेत. तर दुसरी मुलगी दमन सिंग 61 वर्षांची आहे. त्यांना एक मुलगा आहे. तर तिसरी मुलगी अमृत सिंग 58 वर्षांची आहे. अशा स्थितीत मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे.

