

Dog's Bark Saves Lives : पाळीव प्राण्यांना धोक्याची जाणीव लवकर हाेते. ते अनोळखी आवाज, हालचाल किंवा गंध ओळखून ते सावध हाेतात. मालकांनाही धोक्याबाबत सूचित करतात, याबाबत तुम्ही ऐकले असेल;पण एका पाळीव श्वानामुळे तब्बल ६७ जणांचे प्राण वाचल्याची आश्चर्यकारक घटना हिमालच प्रदेशमध्ये घडली आहे. मंडी जिल्ह्यातील धरमपूर भागातील सियाठी गावात एका कुत्र्याच्या भुंकण्यामुळे २० कुटुंबातील ६७ जणांना वेळेवर जीव वाचवता आला. ही घटना ३० जून रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली.
हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरुच आहे. ढगफुटी, अचानक आलेल्या पुराबरोबरच भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,सियाठी गावात सततच्या पावसात रहिवासी नरेंद्र यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेला कुत्रा अचानक जोरात भुंकू लागला. यानंतर भीतीने आवाज करू लागला. नरेंद्र म्हणाले की, श्वान इतक्या जोरजोरात भूकंत होता की, त्याच्या आवाजने जागा झालो. मी वरच्या मजल्यावर गेलो तेव्हा पाहिले की भिंतीला मोठी भेगा पडली असल्याचे आणि घरात पाणी शिरू लागल्याचे दिसले. . मी लगेच खाली धावत जाऊन सर्वांना जागे केले. यानंतर नरेंद्रने उर्वरित गावकऱ्यांना जागे केले. त्यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास सांगितले. पाऊस इतका जोरदार होता की लोक त्यांचे सामानही घेऊ शकले नाहीत आणि रिकाम्या हाताने पळून गेले. त्यानंतर लगेचच गावात एक भयानक भूस्खलन झाले, ज्यामध्ये सुमारे एक डझन घरे जमीनदोस्त झाली. सियाठी गावात आता फक्त ४-५ घरे दिसत आहेत, उर्वरित घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
या दुर्घटनेनंतर ग्रामस्यांना सरकारकडून १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. जवळच्या गावांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. २० जूनपासून हिमाचलमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ५० जणांनी पावसाशी संबंधित अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत राज्यात २३ पूर, १९ ढगफुटी आणि १६ भूस्खलनाची नोंद झाली आहे. मंडी जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे, जिथे १५६ रस्ते अजूनही बंद आहेत. हवामान खात्याने १० जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा इशारा दिला आहे.