

नवी दिल्ली; पीटीआय : अमृत भारत एक्स्प्रेसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ट्रेनमधील कर्मचारी कचर्यातील प्लेट्स आणि बॉक्स वापरताना दिसत आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पॅन्ट्री कारमधील कर्मचारी डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्स वॉश बेसिनमध्ये धुऊन परत वापरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेकजण डिस्पोजेबल बॉक्समध्ये खाद्यपदार्थ घेऊन जातात. तसेच स्वतः साठी पेपर प्लेटदेखील नेतात. या प्लेट्स वापरून झाल्यावर फेकून दिल्या जातात. मात्र याच फेकलेल्या घाणेरड्या प्लेट्स आणि बॉक्स जर रेल्वे वापरत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक प्रवासी ट्रेनमध्ये जेवणाची ऑर्डर करतात. या जेवणासाठी अशा घाणेरड्या प्लेट्स किंवा बॉक्स, डबे वापरले जात असतील तर त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.कचर्यात फेकून दिलेल्या या डब्यांना अनेक जंतू लागलेले असू शकतात. याच प्लेट्समधून पदार्थ खाल्ल्याने अनेक आजारांना आयतेच आमंत्रण मिळण्याचा धोका संभवतो. त्यामुळेच रेल्वेतील हा उबग आणणारा प्रकार पाहून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.