

नवी दिल्ली : 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान, देशाची राजधानी दिल्लीतील 'डिनर डिप्लोमसी'मुळे याविषयीच्या शंकाना आणखी बळ मिळाले आहे. यानंतर आदित्य ठाकरे स्वतः बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांच्या दिल्लीवारी आले. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांसोबत स्नेहभोजन केले आणि वज्रमूठ कायम ठेवण्यास खासदारांना सांगितले.
तसेच एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला कळवल्याशिवाय जाऊ नये किंवा टाळावे, अशा सूचना त्यांनी खासदारांना केल्याचे समजते. मात्र, या स्नेहभोजनावेळी दिलेल्या सूचनांमुळे खासदार नाराज असल्याचेही मानले जात आहे. यामुळे ऑपरेशन टायगर विषयीच्या चर्चांना आणखी जास्त उधाण आले आहे.
हिवाळा संपत आला असला तरीही राजधानी दिल्लीमध्ये आणखी थंडी जाणवत आहे. या थंडीत, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये स्नेहभोजन आणि गप्पांचे कार्यक्रम रंगल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ३० जानेवारीपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपला. यामुळे दोन्ही गटांतील खासदार दिल्लीमध्ये होते. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आणखी दोन खासदारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे कार्यक्रम झाले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते. काही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला उपस्थित होते. यावेळी जुन्या आठवणी आणि गप्पा रंगल्याचे समजते.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. दोन्ही गटांमध्ये आतापर्यंतच्या टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप पाहता खासदारांनी असे स्नेहभोजनाला एकत्र येणे, यामुळे याविषयीच्या जास्तीचा चर्चा होत आहेत.
या स्नेहभोजन कार्यक्रमांच्या चर्चा रंगल्या असताना आदित्य ठाकरे बुधवारी उशिरा राजधानी दिल्लीत आले. गुरुवारी ठाकरे गटाच्या खासदारांनी संजय राऊत यांच्या घरी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी खासदारांनी पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव यांना ऑपरेशन टायगर विषयी विचारले असता त्यांना संताप अनावर झाला. ऑपरेशन टायगर फेल आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु असल्या तरीही दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरेंसोबतच्या स्नेहभोजनाला जवळपास सर्व खासदारांनी उपस्थिती लावली होती. शिवसेना ठाकरे गटाचे ९ खासदार लोकसभेत आहेत. खासदार अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील-आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव हे आदित्य ठाकरेंना भेटले.दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी, अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांनी या विषयी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा या पत्रकार परिषदेत ८ खासदार उपस्थित होते. तर खासदार संजय दिना पाटील संजय राऊत यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा आमची वज्रमूठ मजबूत आहे, टायगर अभी जिंदा है, आम्ही शंभर टक्के कुठेच जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती खासदार अरविंद सावंत यांनी केली होती.