

नवी दिल्ली : ऑल इंडिया (मुस्लिम) उलेमा बोर्डाच्या 17 मागण्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या सकारात्मक उत्तराने राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपने त्यावर थेट काँग्रेस नेते राहुल गांधींकडून उत्तर मागितले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पटोलेंना सबुरीचा सल्ला दिला आहे.
पत्रात कोणी काय लिहिले आणि काय उत्तर दिले हे मला माहीत नाही. मात्र, राज्य सरकारांना नियम आणि कायद्यानुसार काम करावे लागते. कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणाचीही मागणी पूर्ण होत नसते, असा कानमंत्र सिंह यांनी पटोलेंना दिला.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या पत्रानुसार, ऑल इंडिया (मुस्लिम) उलेमा बोर्डाने महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून शिक्षणात 10 टक्के आरक्षणासह इतर 17 मागण्या केल्या आहेत. त्या मान्य झाल्यास उलेमा काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देतील, असे यात म्हटलेले आहे. त्यावर, उलेमा बोर्डाचे निवेदन आम्हाला मिळाले असून, ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये आम्हाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यांच्या 17 मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्ड प्रचार करेल. उलेमांच्या 17 मागण्यांबाबत महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी नक्कीच पावले उचलू, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिल्याचे पत्रात नमूद आहे. भाजपने हे पत्र उचलून धरले असून, त्याबाबत थेट राहुल गांधींना जाब विचारला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी, जिथे जिथे डबल इंजिनचे सरकार आहे तिथे अल्पसंख्याकांना त्रास दिला जात आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही सांगितले. रतलाम आणि शाजापूरच्या घटनांतील दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे, असे ते म्हणाले.