दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता देवेंद्र फडणवीस यांचे आगमन
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ १ आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे देशभरातील नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत. याच मालिकेत भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही दिल्लीत आगमन झाले. बुधवारपासून तीन दिवस देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत भरगच्च कार्यक्रम आहेत. विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
दिल्ली आणि परिसरामध्ये देशाच्या सर्व भागातील नागरिक राहतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशी अनेक कारणे या गोष्टीला आहेत. अर्थातच यापैकी बहुतांश नागरिक दिल्लीतील मतदार आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपने जवळजवळ सर्व केंद्रीय मंत्र्यांसह भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनाही प्रचारासाठी निमंत्रित केले आहे. यामध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनीही आतापर्यंत पक्षाच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. यामध्येच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल झाले आहेत.
...म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीत!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते आहेत. मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेवरही त्यांची चांगली पकड आहे. उत्तम प्रशासक म्हणून देशात त्यांचा लौकिक आहे. भाजपमध्ये देशपातळीवरील नेत्यांमध्ये त्यांची गणणा केली जाते. दिल्लीसह परिसरात मराठी नागरिकांची ही संख्या जवळपास ७ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्ताने मराठी मतांसह सुशिक्षित, युवक आणि विविध घटकांतील मतदारांवर डोळा ठेवत भाजपने त्यांनाही निमंत्रित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला प्रतिकूल परिस्थिती होती. या परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे हाही विचार करून भाजपने त्यांना निमंत्रित केल्याचे समजते.
काँग्रेसकडून आतापर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याव्यतिरिक्त तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेडी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय, खासदार इम्रान प्रतापगडी यांनी प्रचारात सहभाग घेतला.

