

नवी दिल्ली : नांदेड-मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये एसी डब्बे वाढवण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालय सर्वसामान्यांच्या सोयीसाठी देशभरातील रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवत आहे. त्यासाठी १० हजार जनरल डब्बे तयार केले जात आहेत.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित पुरवणी प्रश्नात नांदेड-मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये एसी डब्बे वाढवण्याची काही योजना आहे का, असा सवाल मंत्र्यांना केला. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले की, देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करतात. या रेल्वेमध्ये खासदार-आमदारही चांगल्या संख्येने प्रवास करतात. हे लक्षात घेऊन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी डब्ब्यांची संख्या वाढवली असती तर बरे झाले असते. रेल्वेमंत्र्यांनी खासदारांची मागणी साफ फेटाळून लावली.
रेल्वे मंत्रालयाने खेळाडूंच्या तिकीटावरील सवलत वाढवण्यास नकार दिला. अनेकवेळा ही मागणी लोकसभेत करण्यात आली आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने ती फेटाळून लावली आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ही मागणी केली होती. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, खेळाडूंना सरकार अगोदरच तिकिटावर सवलत देते. १०० रुपयांच्या रेल्वे तिकिटावर सरकार ४६ रुपये सवलत देते. प्रवाशांकडून फक्त ५४ रुपये घेतले जातात. म्हणजेच प्रत्येक तिकिटावर ४६ टक्के सवलत मिळते.
एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, नमो रॅपिड ट्रेन कमी अंतरासाठी विकसित केली गेली आहे. ही नवी रेल्वेगाडी सध्या भूज ते अहमदाबाद दरम्यान चालवली जात आहे.