

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशभरात कडाक्याच्या थंडीसह दाट धुकेही पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशसह १७ राज्यांमध्ये दाट धुके होते. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये दृश्यमानता शून्यावर आली होती. राजधानी दिल्लीत धुक्यामुळे विमावसेवा प्रभावित झाली असून यामुले तब्बल १२० उड्डाणांना उशीर झाला. यातील ४ उड्डाणे रद्द करावी लागली. तसेच दाट धुक्यांचा फटका रेल्वेसेवेलाही बसला. अनेक रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा दिल्ली स्थानकावर पोहोचल्या. (Cold Wave)
जवळपास पूर्ण उत्तर प्रदेशात धुके आहे. दिल्लीलगत नोएडामध्ये आणि अमृतसरमध्ये शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. हिमाचल प्रदेशात रविवारी बर्फवृष्टी होऊ शकते. दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Cold Wave)