नवी दिल्ली : बुधवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक काहीसा सुधारला. मात्र तरीही दिल्लीची हवा 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे. मंगळवारी हवा 'गंभीर' श्रेणीत होती, बुधवारी हवेत थोडीशी सुधारणा झाली. त्यामुळे श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथ्या टप्प्याअंतर्गत लावलेले निर्बंध मागे घेण्यात आले तर तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध कायम आहेत.
राजधानी दिल्लीत नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिसेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात तर हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे असल्याचे दिसून आले. मंगळवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०१ होता तर बुधवारी सकाळी ८ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक ३३३ नोंदवला गेला. त्यामुळे गेल्या काही दिवसात बुधवारी हवेत काहीसा सुधार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर श्रेणीबद्ध उपाय योजनांच्या चौथ्या टप्प्यातील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध अजूनही लागू आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने सदर आदेश जारी केले. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग ही दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी केंद्रीय संस्था आहे.