

नवी दिल्लीः दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आयएएस अधिकारी अझीमुल हक यांची दिल्ली वक्फ बोर्डाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सीईओच्या नियुक्तीबद्दल कायदेशीर तरतुदींचे पालन न करता दिल्ली सरकारने उदासीनता दाखवल्याबद्दल नायब राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक निवेदन जारी करुन सक्सेना यांनी ही मान्यता दिली आहे.
दिल्ली वक्फ बोर्डातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे पद २८ नोव्हेंबर २०२४ पासून रिक्त होते, असे नायब राज्यपालांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सरकारच्या या उदासीनतेमुळे वक्फ बोर्डाचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. इमाम आणि इतरांना पगार देण्यासही विलंब झाल्याचे नायब राज्यपालांनी म्हटले आहे. नियुक्तीच्या प्रस्तावाला आता वक्फ बोर्डाने मान्यता देणे आवश्यक आहे. संसदेने लागू केलेल्या दिल्ली वक्फ कायदा, १९९५ नुसार, सीईओची नियुक्ती कायद्याच्या कलम २३ नुसार केली जाते.