

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई-वडिलांसह मुलीच्या खुनाच्या घटनेने बुधवारी दिल्ली हादरली. माझ्या आई-वडिलांसह बहिणीचा चाकूने भोसकून खून केल्याची फिर्याद मुलाने दिली. मात्र या ट्रिपल मर्डरचा ( Delhi triple murder) तपासाला धक्कादायक वळण लागले आहे. पोलीस तपासात प्रशिक्षित बॉक्सर मुलाने केलेल्या बनावाचा पर्दाफाश झाला. त्याने केलेल्या कृत्यामागील कारण ऐकून पोलिसही हादरले.
दिल्लीनजीकच्या नेब सराई परिसरात राजेश कुमार (वय ५१), त्यांची पत्नी कोमल (४६) आणि मुलगी कविता (२३) यांचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. आपण पहाटे फिरायला गेल्यानंतर हल्लेखोराने आई-वडिलांसह बहिणीचा चाकूने भोसकून खून केल्याचे माहिती अर्जुन याने पोलिसांना दिली.
२०वर्षीय अर्जूनने दिलेल्या फिर्यादानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. अर्जुनने सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकवरून परतल्यावर कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र पोलिसांना अर्जुनच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. अखेर त्याने गुन्हा कबुल करताना सांगितले की, माझ्यापेक्षा आई-वडिलाना माझी बहिण अधिक प्रिय होती. ते बहिणीला जास्त पसंत करायचे. वडील सेवानिवृत्त झाले होते. आईवडील आपली मालमत्ता बहिणीकडे हस्तांतरित करण्याचा विचार करत होते. यावरुन त्याचे आई-वडिलांशी वाद होत होते. याच वादातुन त्याने तिघांची हत्या केल्याची कुबल अर्जुन याने दिल्याची माहिती पोलीस सहआयुक्त डॉ. एस.के.जैन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस सहआयुक्त डॉ. एस.के.जैन यांनी सांगितले की, मुलाने दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. आई-वडील आणि मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी श्वान पथकासह फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. घरात कोठेही तोडफोड किंवा चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिसांच्या चौकशीत अर्जुन याच्या विधानांमध्ये विसंगती आढळून आली. अर्जुनने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ४ डिसेंबरला आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांना झोपेतच चाकूने भोकसून खून केल्याची कबुली त्याने दिली.
अर्जुन हा दिल्ली विद्यापीठातील बीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे, हा एक प्रशिक्षित बॉक्सर आहे. त्याने बॉक्सिंगमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.