नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जगातील सर्वात जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. मात्र दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तसेच दिल्ली सरकारने प्रदुषण रोखण्यासाठी कोणतीही विशेष तयारी केली नाही, सरकारने स्थापन केलेल्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला यासाठी पुरेशी पावले उचलण्यात यश आले नाही, असे म्हणत दिल्ली सरकारसह आयोगावरही न्यायालयाने ताशेरे ओढले.
दिल्लीतील प्रदूषण प्रकरणी गुरुवारी सुनावणी पार पडली. यापुर्वी फटाके बंदीवरून न्यायालयाने सरकारला फटकारले होते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदीवस गंभीर श्रेणीत पोहोचत आहे. गुरुवारी दिल्लीतील काही भागात हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या पुढे गेला.
दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी श्रेणीबद्ध उपाय योजनांचा दुसरा टप्पा लागू करण्यात आल्याचे सांगितले. या टप्प्यात दिलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, यासाठी त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचनाही दिल्या. यापुर्वी १४ ऑक्टोबरला श्रेणीबद्ध उपाययोजनांचा पहिला टप्पा लागू करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजता दिल्लीतील विविध भागात प्रदूषण अत्यंत वाईट श्रेणीतून गंभीर श्रेणीत पोहोचले. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक ५६७ नोंदवला गेला. तर पंजाबी बागेत आणि आनंद विहारमध्ये ४६५ नोंदवले गेले. राजधानीत थंडीसह दाट धुके आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून काही ठिकाणी धुररोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परीसरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरीकांना थंडी जाणवत आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहे. पुढील काही दिवस राजधानीत असेच वातावरण राहणार असल्याने धुके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परीसरात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागू शकतो.
दिल्लीतील वाढत्या प्रदुषणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, सुंदर हवा असलेल्या आणि हवा गुणवत्ता निर्देशांक ३५ असेलल्या वायनाडहून दिल्लीला परत येणे म्हणजे गॅस चेंबरमध्ये प्रवेश करण्यासारखे होते. हवेत असणारी धुक्याची चादर धक्कादायक आहे. दिल्लीचे प्रदूषण दरवर्षी वाढतच चालले आहे. सर्वांनी एकत्र येत स्वच्छ हवेसाठी उपाय शोधला पाहिजे. हा पक्ष की तो पक्ष या पलिकडील ही समस्या आहे. यात लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या समस्या असलेल्यांना श्वास घेणे अशक्य आहे. यावर उपाय केलाच पाहीजे, असेही त्या म्हणाल्या.