

Delhi Red Fort Metro Station explosion
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेनं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ एका कारमध्ये सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोण लगतच्या वाहनांपर्यंत पोहोचले. स्फोट आणि आगीचे वृत्त समजताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
स्फोटाच्या आवाजामुळे खुर्चीवरून खाली पडलो. आवाज इतका जोरात होता की आम्हाला काही क्षणासाठी वाटलं की आज आपला मृत्यू येणार आहे. संपूर्ण परिसर आवाजाने हादरला.
प्रत्यक्षदर्शी दुकानदार
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून घटनास्थळावरून गर्दी हटवण्यात येत आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. पोलिसांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
दिल्लीत हायअलर्ट जारी
दिल्लीतील लाल किल्ला हा संवेदनशील परिसर असून या भागात पर्यटकांची वर्दळ असते. तसेच दिल्लीत बाजारपेठाही याच भागात आहेत. अशा भागात स्फोटाची घटना घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली आणि एनसीआर भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत स्फोट
केंद्र आणि राज्याच्या सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागातून दहशतवादी संघटनांशी संबंधित तरुणांना अटक केली होती. इसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना गुजरात एटीएसने बेड्या ठोकल्या होत्या. हे संशयित दहशतवादी रासायनिक विष तयार करत होते. देशभरात हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
तर जम्मू- काश्मीरच्या फरिदाबाद येथून डॉ. आदिल अहमद याला अटक करण्यात आली होती. चौकशीत आदिलने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हरयाणातून तब्बल 350 किलो आरडीएक्स जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील स्फोटाची घटना घडली आहे.