

Delhi Police On Redfort Blast
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटाबाबत दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सिग्नलवर थांबलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला. कारमध्ये प्रवासीही बसले होते. स्फोटामुळे लगतच्या गाड्यांमध्येही आग लागली’, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली. गृहमंत्र्यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी हा घातपात होता का या प्रश्नाचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय, तपास सुरू आहे, असं गोलचा यांनी म्हटलंय.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण लाल किल्ला परिसर आवाजाने हादरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे. हा बॉम्बस्फोट असल्याची शंका उपस्थित होत असतानाच पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सोमवारी संध्याकाळी संथगतीने जाणारी कार लाल सिग्नलमुळे थांबली होती. यादरम्यान कारमध्ये स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी कारमध्ये प्रवासीही होते. स्फोटामुळे लगतच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम, गुप्तचर यंत्रणांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
सतीश गोलचा, पोलीस आयुक्त, दिल्ली पोलीस
पंतप्रधान मोदींनी घेतली माहिती
दिल्ली पोलीस आयुक्तांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे माध्यमांना सांगितले. एएनआयच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद मोदीही घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. स्फोटाचे वृत्त समजल्यावर मोदींनी अमित शाहांशी फोनद्वारे चर्चादेखील केल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले.
सीआरपीएफचे महासंचालक काय म्हणाले?
दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफकडे आहे. स्फोट झाला तिथून लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळच असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक किशोर प्रसादही घटनास्थळी पोहोचले. माध्यमांनी किशोर प्रसाद यांना प्रश्न विचारले असता, सध्या काही सांगता येणार नाही. मी आत्ताच घटनास्थळी पोहोचलो आहे. मला आधी माहिती घेऊ द्या, असं त्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाने काय माहिती दिली?
दिल्लीतील अग्निशमन विभागाचे अधिकारी ए के मलिक म्हणाले, आम्हाला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याचा कॉल आला. स्फोटामुळे काही गाड्यांना आग लागल्याचे आम्हाला समजले. अवघ्या 34 मिनिटांमध्ये आम्ही आगीवर नियंत्रण मिळवले. संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी आग विझवण्यात आली होती.
आठ जणांचा मृत्यू
रात्री साडे आठपर्यंतच्या माहितीनुसार स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तर एएनआयच्या वृत्तानुसार 15 जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली.
छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह रस्त्यावर
स्थानिकांनी सांगितले की, आवाज ऐकून आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तिथे रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दिसले. कुठे हात पडलाय तर कुठे फुफ्फुस पडले होते. मग आम्ही पुढे गेलो नाही.