

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील रस्त्यावर एका थांबलेल्या कारमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले. तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपास अहवालात स्फोट करण्यासाठी अमोनियम नायट्रेट इंधन तेल मिश्रण (एएनएफओ) व डिटोनेटर वापरला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमोनियम नायट्रेट हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे नायट्रोजन खत विध्वंसक स्फोटास जबाबदार ठरले.
अमोनियम नायट्रेट हे एक सामान्य खत व औद्योगिक रसायन; मात्र रासायनिकदृष्ट्या हे एक शक्तिशाली ऑक्सिडायझरही आहे, म्हणजे त्यात ज्वलनशील क्षमता नाही. मात्र, अमोनियम नायट्रेटमध्ये सुमारे 6 ते 10 टक्के इंधन तेल (हेवी फ्यूल ऑईल) घातल्यास ते अत्यंत विध्वंसक विस्फोटक मिश्रण बनते, ज्याला ‘एएनएफओ’ म्हणतात. या मिश्रणाच्या साठ्यात योग्य डिटोनेटर/इग्निशन दिल्यास स्फोट इतका भयंकर होऊ शकतो की, आसपासच्या इमारती नष्ट होतील.
‘एएनएफओ’चे रासायनिक विघटन अतिशय उच्चदाब व तापमान निर्माण करते, ज्यामुळे ‘शॉक वेव्ह’ तयार होते आणि तिच्या परिघात येणाऱ्या सर्व गोष्टींचा चुराडा होता. यामुळे काचेचा चक्काचूर, इमारतींच्या भिंतींचे तडे, आग लागणे आणि जीवितहानी असे घातक परिणाम दिसतात. याशिवाय स्फोटानंतर निघणाऱ्या वायूंमध्ये नायट्रोजन ऑक्साईडस् आणि इतर घातक वायू असू शकतात, ज्यामुळे श्वसनाचे गंभीर त्रास दिसू शकतात.
‘एएनएफओ’ आणि ‘आरडीएक्स’ या दोन्ही स्फोटकांमध्ये मूलभूत फरक त्यांच्या रासायनिक स्वरूपात आणि विस्फोटक क्षमतेत आहे. ‘एएनएफओ’ (अमोनियम नायट्रेट-इंधनतेल मिश्रण) हे दोन घटकांपासून बनलेले संयुग आहे. याउलट ‘आरडीएक्स’ (रिसर्च डिपार्टमेंट एक्स्प्लोझिव्ह) हे एक स्वतंत्र, उच्चश्रेणीचे सैनिकी दर्जाचे स्फोटक आहे, जे कमी प्रमाणातही अत्यंत तीव्र आणि जलद डिटोनेशन घडवते. ‘आरडीएक्स’ हे तीव्रतेने विध्वंस करणारे स्फोटक आहे, तर ‘एएनएफओ’ हे प्रमाणाने विनाश घडवणारे स्फोटक आहे.
पुणे साखळी बॉम्बस्फोटात 2010 सालीदेखील नायट्रेट व इंधन तेल मिश्रणाचा वापर झाला होता. हैदराबादमधील 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातदेखील याचा वापर झाला होता.