

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलास गहलोत यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेनुसार दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलाश गेहलोत यांनी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे लिहिले आहे की, "राज्य सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्र सरकारवर टीका करण्यात घालवत आहे. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे मी 'आप'पासून फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
याचबरोबर पत्रामध्ये गेहलोत यांनी लिहले आहे की, त्याच वेळी मला हे देखील सांगायचे आहे की आज आम आदमी पार्टीसमोर गंभीर आव्हाने आहेत. पार्टीच्या ज्या मूल्यांनी आपण एकत्र आलो होतो. ती मुल्ये आता मला दिसत नाहीत. राजकीय महत्त्वाकांक्षेने लोकांप्रती असलेली बांधिलकी ओलांडली आहे, तसेच आपण जनतेला दिलेली अनेक आश्वासने अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ यमुना नदी, जिला स्वच्छ नदीत रूपांतरित करण्याचे वचन दिले होते, पण ते पूर्ण करू शकलो नाही. आता यमुना नदी कदाचित पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे.
आता 'शीषमहल' सारखे अनेक लाजिरवाणे वाद निर्माण होवून ते चव्हाट्यावर आले आहेत, जे आम आदमी पक्षावर विश्वास ठेवतात त्यांना शंका सगळ्यांना पडत आहे. आणखी एक वेदनादायक बाब म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. यामुळे दिल्लीतील लोकांना मूलभूत सेवा देण्याची आमची क्षमता गंभीरपणे कमी झाली आहे.