

नवी दिल्ली : दिल्ली-मेरठ नमो भारत मार्गावर १६ नोव्हेंबरपासून आठ अतिरिक्त जलद गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्या सर्व स्थानकांवर न थांबता केवळ पाच प्रमुख स्थानकांवर थांबणार असल्याने सराय काले खां ते मोदीपुरम हा प्रवास ५० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (एनसीआरटीसी) वतीने या जलद गाड्या सुरू करण्यात येत आहेत. सराय काले खां, आनंद विहार, गाझियाबाद, बेगमपुल आणि मोदीपुरम या पाच स्थानकांवरच त्यांना थांबा असेल. मर्यादित थांब्यांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सध्या दिल्ली, गाझियाबाद आणि मेरठदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
नव्या जलद सेवेमुळे आनंद विहार ते गाझियाबाद हे अंतर अवघ्या आठ मिनिटांत, तर गाझियाबाद ते बेगमपुल हे अंतर २८ मिनिटांत पार करता येईल. आनंद विहार ते बेगमपुलदरम्यानचा प्रवास केवळ ३६ मिनिटांचा असेल. त्यामुळे दिल्ली ते मेरठदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
नव्या आठ अतिरिक्त गाड्या सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत धावतील. दोन्ही दिशांनी सकाळी ८ आणि ८.३० वाजता, तर संध्याकाळी ६ आणि ६.३० वाजता गाड्या उपलब्ध असतील. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्यांना विशेष सोय मिळणार आहे. दरम्यान, या जलद गाड्या सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या नियमित सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्या पूर्वीप्रमाणेच धावत राहतील. तसेच नियमित सेवांमध्ये दर दहा मिनिटांनी गाडी उपलब्ध होण्याची सुविधाही कायम राहणार आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये वाढते वायुप्रदूषण आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी लक्षात घेता जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या या मार्गावर दररोज सुमारे १.१ लाख प्रवासी प्रवास करतात. नमो भारत सेवांनी आतापर्यंत पाच कोटी प्रवाशांचा टप्पाही पार केला आहे.