नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात ( Delhi Liquor Policy Case) आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) संपर्क प्रभारी विजय नायर यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) न्यायालयाला आश्वासन देऊनही वेळेवर खटला पूर्ण करू शकले नाही. न्यायालयाने पुढे नमूद केले की, नायर २३ महिन्यांपासून कोठडीत आहेत. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, असे न्यायालयाने अधोरेखित केले.
या खटल्यातील इतर आरोपी मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या जामीन आदेशांची दखल न्यायालयाने घेतली. त्यांच्याप्रमाणेच नायर यांना जामीन मंजूर करण्यात आला. वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी नायर यांची बाजू न्यायालयासमोर मांडून जामीन देण्याची मागणी केली. तर ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जामीन देण्यास विरोध केला.