पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. नवे मुख्यमंत्री आतिशी यांच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर या तारखेचा प्रस्तावही त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांचे राजीनामा पत्रही राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. तसेच आतिशी यांच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर ही तारीरख प्रस्तावित ठेवली आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, AAP विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी समारंभासाठी कोणतीही तारीख प्रस्तावित केलेली नाही.
अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. आता ते सरकारी निवासस्थान सोडणार आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही त्यांना सुरक्षेच्या कारणास्त सरकारी निवासस्थान सोडू नये, असे सांगितले; पण त्यांनी ते मान्य केले नाही.