

पुढारी ऑनलाईन डेस्क :
विविध मागण्यांसाठी दिल्ली च्या शंभू सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज ८ डिसेंबर रोजी दिल्लीत कूच करण्यासाठी ‘दिल्ली चलो’ मार्चचे आयोजन केले होते. पण हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले. आंदोलक शेतकरी व पोलिसांच्यात बाचाबाची झाली. तसेच पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे शेतकरी माघारी फिरत आहेत.
सकाळी मार्च सुरु होण्याआधी पोलिसांनी आंदोलकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरवात केली. दिल्लीकडे जाण्याची मागणी शेतकरी करत होते पण पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. आंदोलक व पोलिस यांच्यात बाचाबाची सुरु झाली. काही शेतकरी बॅरीकेट तोडण्याचा प्रयत्न करू लागले पण पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना पांगवले. यामध्ये रेशम सिंग नामक शेतकरी जखमी झाला. यानंतर आंदोलक संतप्त झाले ते पुन्हा दिल्लीकडे कूच करु लागले. परत तिन अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामध्ये तीन शेतकरी जखमी झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर फुले टाकण्यास सुरवात केली. यानंतर शेतकरी नेते सरवण सिंह पधेर हे त्याठिकाणी आले. त्यांनी शेतकऱ्यांना परत फिरण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान शेतकरी फेब्रुवारी २०२४ पासून दिल्ली हरीयाणामधील शंभू सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. गेले ३०० दिवस हे आंदोलन सुरु आहे.शेतमाला किमान आधारभूत किंमत मिळावी व कर्जमाफी या प्रमूख मागण्यासांठी शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरु आहे.