

पुढारी ऑनलाईन डेस्क : वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना आज (दि.१४) जामीन मंजूर केला. वक्फ बोर्ड प्रकरणात त्यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालया(ईडी)ने २ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना अटक केली होता.
सप्टेंबर २०२२ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सप्टेंबर 2022 मध्ये अमानतुल्ला यांची चौकशी केली होती. त्याआधारे एसीबीने चार ठिकाणी छापे टाकले होते. सुमारे 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. दोन विनापरवाना पिस्तुले सापडली. काडतुसे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. त्याआधारे अमानतुल्लाला अटक करण्यात आली. 28 डिसेंबर 2022 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
१० ऑक्टोबर २०२३ रोजी ईडीने अमानतुल्ला खान यांच्या संबंधित असणार्या दिल्लीतील 5 ठिकाणी छापे टाकले. ईडीने अमानतुल्ला खान यांच्या घरावरही छापा टाकला होता. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या दोन एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली होती. दिल्ली वक्फ बोर्डातील नोकऱ्यांमधील अनियमिततेशी संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई झाली होती. १८ एप्रिल २०२४ रोजी ईडीने अमानतुल्ला खान यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ईडीसमोर हजर झालो आहे. तपास यंत्रणेने चौकशी करून माझे जबाब नोंदवले, असे खान यांनी सांगिलते होते.
अमानतुल्ला खान हे 2018 ते 2022 दरम्यान दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने भाड्याने दिल्याच्या आरोपांची ईडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी खान यांची 12 तासांहून अधिक चौकशी केली आहे. खान यांनी बेकायदेशीर कृत्यांमधून मोठी रक्कम मिळवली. यातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली, असाही त्यांच्यावर आरोप आहे.