

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे उरले असतानाच सत्ताधारी भाजप आणि विरोधी इंडिया आघाडीकडून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नातूनच भाजपच्या हल्ल्यामुळे आम आदमी पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या अडचणी बघून काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या येऊ लागल्याचे दिसून आले आहे.
इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस आपसोबत उभे असल्याचे वरकरणी दाखवत असली तरीही केजरीवाल यांना राजकीय अडचणीत आणण्यात काँग्रेसचा मोठा हातभार असल्याचे आढळून आले आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याचे पुरावे गोळा करण्यात काँग्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी सर्वप्रथम मद्य धोरण घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आम आदमी पक्षाचे खलिस्तानी संबंध काँग्रेसनेच उजेडात आणले होते. काँग्रेसच्या आरोपामुळेच याप्रकरणी एनआयए संस्थेने चौकशी सुरू केली होती.
दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपसोबत आघाडी केली असली तरीही मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसनेच कायदेशीर अडचणीत आणले आहे. त्यामुळे केजरीवाल यांची सध्याची स्थिती बघता, आपले डावपेच यशस्वी ठरल्याचा आनंद काँग्रेसला होऊ लागल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांच्या अडचणी जितक्या वाढतील, तितकाच काँग्रेसला जास्त फायदा होईल, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. दिल्लीत काँग्रेसच्या बाजूने असलेले मतदार आम आदमी पक्षाने खेचून घेतले आहेत. त्यामुळे आप कमकुवत झाल्यास हा मतदारवर्ग पुन्हा काँग्रेसकडे परत येईल, असे या नेत्याला वाटते.
पंजाबमध्येही काँग्रेसच्या व्होट बँकेवर ताबा मिळवून आपने सत्ता मिळविली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़ या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होण्यामागे आपची भूमिका कारणीभूत आहे. काँग्रेसच्या मतांवर आपने डल्ला मारल्यामुळे भाजपला त्याचा फायदा मिळाला.
आपमुळे झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसने केजरीवाल यांच्या सध्याच्या अडचणीच्या काळात तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण आणि विदेशातून देणगी स्वीकारल्याच्या मुद्यावर आप अडचणीत आहे. मात्र, तरीही काँग्रेसने केजरीवाल यांच्यावरील आरोपांचे उघडपणे समर्थन केले नसल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा